४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात

नवी दिल्ली/मुंबई : देशातील करोनाबळींचा आकडा ५० हजारांवर पोहोचला आहे. त्यातील २० हजार म्हणजे ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रातील आहेत.

देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या रुग्णसंख्येत ६३,४९० ची भर पडली. याच कालावधीत ९४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण करोनाबळींची संख्या ४९,९८० वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी दिली. मात्र, रात्रीपर्यंत विविध राज्यांनी आकडेवारी जाहीर केल्यानंतर करोनाबळींच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा पार केला. त्यातील २० हजार ०३७ बळी महाराष्ट्रातील आहेत.

देशभरात करोना रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ८९ हजार ६८२ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५३ हजार ३२२ रुग्ण बरे झाले. एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या १८ लाख ६२ हजार २५८ झाली असून, ६ लाख ७७ हजार ४४४ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण आता ७२ टक्क्यांवर गेले आहे. देशभरात सुमारे ३ कोटी नमुना चाचण्या झाल्या असून, गेल्या २४ तासांमध्ये ७.४६ लाख चाचण्या करण्यात आल्या.

राज्यात ११,१११ नवे रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ११,१११ रुग्ण आढळले. दिवसभरात २८८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या ५ लाख ९५ हजार ८६५ झाली आहे.

मृत्युदर १.९३ टक्के

देशात रुग्णवाढ सुरूच असली तरी मृत्युदर उत्तरोत्तर घटत आहे. देशातील करोनाबळींचे प्रमाण १.९३ टक्के आहे. देशात १५६ दिवसांत मृतांचा आकडा ५० हजारांवर गेला आहे. हा आकडा अमेरिकेत २३ दिवसांत तर ब्राझीलमध्ये ९५ दिवसांत पार झाला होता.