बलुचिस्तान प्रांतातील अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तपास ठाण्यावर शुक्रवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने घडविलेल्या बॉम्बस्फोटात अफगाणिस्तानच्या सहा सुरक्षा रक्षकांसह किमान नऊ जण ठार झाले त अन्य १९ जण जखमी झाले.
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तपास ठाण्याजवळ आत्मघातकी हल्लेखोराने बॉम्बस्फोट घडवून सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये आमचे रक्षक आश्चर्यकारकरीत्या बचावले, असे पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
अफगाणिस्तान सीमा कमांडर अख्तर मोहम्मद याला आत्मघातकी हल्लेखोराने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तथापि, अख्तर त्यामधून सुदैवाने बचावले, असे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात जखमी झालेल्या १९ जणांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना क्वेट्टा येथे वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले आहे.
या स्फोटानंतर सीमाक्षेत्र तातडीने बंद करण्यात आले आहे. बलुचिस्तानच्या नैर्ऋत्येकडील भागांत असलेले चमन हे छोटे शहर असून आहे. तालिबान्यांशी लढणाऱ्या अमेरिकेच्या फौजा आणि नाटोची रसद याच मार्गावरून पुरविण्यात येते.