उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे 12 वीत शिकणाऱ्या 15 वर्षांच्या तरुणीवर तिच्याच दोन सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेली 4 वर्षे तिचे दोन्ही भाऊ तिच्यावर बलात्कार करत होते. एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पीडिता आपल्या कुटुंबासोबत मेरठच्या सिव्हिल लाईन परिसरातील पांडवनगरमध्ये राहत होती. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही सख्खे भाऊ धर्मेश आणि प्रशांत गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने तिच्यावर बलात्कार करत होते. याबाबत कोणाला काही सांगितले तर आईला जीवे मारु अशी धमकी ते द्यायचे. तसंच विरोध केला तर तिच्यासोबत जबर मारहाण करायचे. पीडितेच्या वडिलांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला आहे. घरी केवळ आई आणि तिचे दोन भाऊ होते. मात्र, एक दिवस तिने हिंमत करुन सर्वोदय या स्वयंसेवी संस्थेकडे मदत मागितली. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यामुळे तिने पोलिस स्थानक गाठलं आणि भावांविरोधात तक्रार केली.

पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर घटनेची चौकशी सुरू आहे. आम्ही दोन्ही भावांना ताब्यात घेतलं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक रणविजयसिंह यांनी दिली.