मैत्रीत अंतर ठेवल्याने नाराज तरुणीने मैत्रिणीवरच अॅसिड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने दोन तरुणांच्या सहाय्याने हा हल्ला घडवून आणला. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यासोबत असणा-या दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी हा हल्ला झाला. पीडित तरुणी शेअर रिक्षामधून प्रवास करत असताना दुचाकीवरुन जाणा-या दोन तरुणांनी तिच्यावर अॅसिड हल्ला केला. हे अॅसिड रिक्षामध्ये बसलेल्या अन्य दोन महिलांच्या अंगावर पडलं, ज्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत.

सुरुवातीला या हल्ल्यामागे एखाद्या तरुणाचा हात असल्याचा संशय होता. मात्र तपास केला असता पीडित तरुणीच्या एका जुन्या मैत्रिणीने हा हल्ला घडवून आणल्याचं समोर आलं. दोघी एकेकाळी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, आणि एकाच कंपनीत काम करत होत्या. पीडित तरुणीने नोकरी सोडल्यानंतर मात्र ती अंतर ठेऊ लागली. नेमकी हीच गोष्ट आरोपी तरुणीला खटकली आणि तिने दोन तरुणांना अॅसिड हल्ला करण्यासाठी पैसे दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने फक्त अॅसिड हल्ल्यासाठी तरुणांशी संपर्क साधला होता. दोघा तरुणांनी दुचाकीवरुन रिक्षाचा पाठलाग केला. मोहन नगर मेट्रो स्टेशनजवळ त्यांनी रिक्षाला गाठलं आणि अॅसिड फेकलं.

जखमी झालेल्यांमध्ये एक तरुणी आणि महिलाचा समावेश आहे. २० वर्षीय अंशू आणि ४५ वर्षीय कमला यांच्यावरही अॅसिड पडल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. रिक्षात पुढे बसलेले अनिल त्यागीदेखील जखमी झाले आहेत. गेल्या एक वर्षात आरोपी महिलेने तीन वेळा अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यात तरुणीचा २५ टक्के चेहरा भाजला आहे. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.