18 November 2019

News Flash

उत्तर प्रदेश: आमदार मुख्तार अन्सारींच्या मुलाच्या घरातून मोठा विदेशी शस्त्रसाठा जप्त

डॉन असलेल्या आणि आमदार बनलेल्या मुख्तार अन्सारींचा मुलगा अब्बास अन्सारी हा 'शॉट गन शुटिंग' या क्रिडाप्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.

लखनऊ : आमदार मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील तरुंगात असलेला डॉन आमदार मुख्तार अन्सारी यांच्या मुलाच्या दिल्लीतील घरातून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी बनावटीची हत्यारं आणि काडतूसं युपी पोलिसांनी जप्त केली आहेत. लखनऊ पोलिसांसह दिल्ली पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

याप्रकरणी पोलीस अधिकारी कलानिधी नैथानी यांनी सांगितले, १२ ऑक्टोबर रोजी लखनऊमधील महानगर पोलीस ठाण्यात आमदार मुक्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी याच्याविरोधात शस्त्र परवाना फसवणूकप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान पोलिसांना अब्बास हा दिल्लीत राहत असल्याचे कळले. त्यानुसार, दिल्ली पोलिसांच्या मदतीने लखनऊ पोलिसांनी अब्बासच्या बसंतकुंज येथील घरावर छापेमारी केली.

या संयुक्त कारवाईत अब्बासच्या घरातून इटलीची डबल बोअरची बंदूक, स्लोवेनियातून मागवलेली सिंगल बोअरची बंदूक, लखनऊमधून खरेदी केलेली साऊथ केटाफिलची मॅगझीन असलेली रायफल, दिल्लीतून खरेदी केलेली डबल बोअरची बंदूक, मेरठ येथून खरेदी केलेली अमेरिकन बनावटीची रिव्हॉलव्हर, स्लोवेनियातून आयात केलेली रायफल, सात विविध बोअरचे बॅरल, ऑस्ट्रियाची तीन पिस्तूलांची बॅरल, ऑस्ट्रियाच्या दोन मॅगझीन, एक लोडर आणि विविध बोअरचे ४,३३१ काडतूसं पोलिसांना आढळून आली.

डॉन असलेल्या आणि आमदार बनलेल्या मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी हा ‘शॉट गन शुटिंग’ या क्रिडाप्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. जगातील टॉपच्या दहा नेमबाजांमध्ये समावेश असलेला अब्बास हा केवळ नेमबाजीत राष्ट्रीय चॅम्पिअनच नाही तर जगभरातील स्पर्धांमध्ये त्याने भारताला अनेक पदकंही जिंकून दिली आहेत.

First Published on October 18, 2019 11:22 am

Web Title: a large number of foreign weapons were seized from the house of ups mla mukhtar ansaris son aau 85