पश्चिम बंगालचा वारंवार अपमान केला जात आहे. जर तुम्हाला बंगाल आणि बंगालची संस्कृती वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे, कारण बंगालला गुजरात बनवण्याचा डाव आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या हिंसाचारात फोडण्यात आलेला ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा अर्धपुतळा पुन्हा ईश्वरचंद्र विद्यासागर महाविद्यालयात बसवण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, पश्चिम बंगालचा वारंवार अपमान केला जात आहे. त्यामुळे बंगाल आणि बंगालची संस्कृती धोक्यात आली आहे. जर तुम्हाला हे वाचवायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे. राज्यपालांच्या नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे ममता चांगल्याच भडकल्या असून बंगालला गुजरात बनवण्याचा डाव रचला जात आहे, बंगाल हा गुजरात नाही. मी गुजरातच्या विरोधात नाही मात्र, गुजरातमध्ये दंगल घडवणाऱ्यांच्याविरोधात आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच राज्यात राजकीय दंगे झाल्याचे मान्य केले. यावेळी त्यांनी दावा केला की, या दंग्यांमध्ये भाजपाचे दोनच कार्यकर्ते मारले गेले तर तृणमुल काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांचा यात मृत्यू झाला आहे. या राजकीय दंग्यांचे शिकार झालेल्या तृणमुल कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा अर्धपुतळ्याचा बसवण्यापूर्वी ममतांनी प्रतिकात्मक रॅली काढली, यावेळी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थकांनी हजेरी लावली. त्यानंतर पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर कार्यक्रमात बोलताना पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. ‘मी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा आदर करते. मात्र, प्रत्येक संविधानिकपदाच्या काही मर्यादा असतात, या मर्यादा त्यांनी पार करु नयेत. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजच सकाळी भेट घेतली. या भेटीवरुन ममतांनी त्यांच्यावर निशाणा साधला.