ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर.रहमान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील सभागृहात झालेल्या मैफलीत रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी कर्नाटक संगीतातील गायिका एम. सुब्बलक्ष्मी यांच्या संगीत रचना, काही सूफी गीते व तालाचा ठेका धरायला लावणारे ‘जय हो’ गीत अशी विविधांगी अदाकारी केली. भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ही मैफल आयोजित केली होती. सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रांत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळालेले रहमान हे दुसरे भारतीय संगीतकार आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी दूतावासाने शंकर नेत्रालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात रहमान यांनी सुब्बलक्ष्मी यांना जन्मशताब्दीनिमित्त संगीतमय आदरांजली वाहिली. भारतरत्न सुब्बलक्ष्मी यांना ऑक्टोबर १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस उ थांट यांच्या निमंत्रणावरून संगीत मैफल सादर करण्याची संधी मिळाली होती. रहमान यांनी तीन तासांच्या मैफलीत सुब्बलक्ष्मी यांच्या रचना सादर केल्या. सनशाइन ऑर्केस्ट्रा या ए.आर.रहमान फाउंडेशनच्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. वंचित गटातील तरूणांना संगीताचे शिक्षण देण्याचे काम ही संस्था करते. आजपासून तुम्ही वंचित राहिलेला नाहीत, तर विशेषाधिकाराचे धनी झाला आहात असे सांगून रहमान यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. रहमान यांच्या दोन बहिणींनी जावेद अली व शिवमणी यांच्याबरोबर गायन सादर केले. रहमान संगीत साधनांच्या गराडय़ात बसलेले होते. त्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेत वाहवा मिळवली. दिल से, बॉम्बे या चित्रपटातील गाणी व वंदे मातरम त्यांनी सादर केले. रहमान व त्यांच्या चमूने ख्वाजा मेरे ख्वाजा, मौला मौला ही सुफी गीते सादर केली. जय हो या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ चित्रपटातील गीतावर लोकांनी ठेका धरला. काही प्रेक्षकांनी त्यावर उत्स्फूर्तपणे नृत्यही केले. जगाचे प्रश्न एकमेकांना ठार करून सुटणार नाहीत, त्यामुळे जगात शांतता नांदावी असे प्रयत्न सर्वानीच केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.