फिलिपाइन्स – या आशियायी देशात व्यभिचार किंवा दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणे हा अजूनही गुन्हा आहे. दोन्ही गोष्टी या सुधारित दंड संहितेनुसार गुन्हा आहे. कौटुंबिक संहितेनुसार तो बाहेरख्यालीपणा मानला आहे. पत्नी व तिचा पती यांना यात सहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होते. जर पुरूषाने त्याच्या पत्नीने दुसऱ्या पुरूषाशी विवाह्य़बाह्य़ संबंध ठेवल्याचे सिद्ध केले तर शिक्षा होते. जर एखाद्या महिलेच्या पतीने दुसऱ्या महिलेशी विशिष्ट वादग्रस्त स्थितीत शरीरसंबंध  ठेवले तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्याला चार वर्षे एक दिवस  तुरूंगवासाची शिक्षा होते. चीन- चीनमध्ये व्यभिचार हा  गुन्हा नाही, पण व्यभिचार केल्यास घटस्फोटाचे ते कारण ठरू शकते. चीनच्या विवाह कायदा कलम ४६ अन्वये पीडित पक्षाला भरपाई मागण्याचा अधिकार आहे.

सौदी अरेबिया, सोमालिया व इस्लामी देश- या देशांमध्ये झिना म्हणजे विवाह्य़बाह्य़ संबंध हे प्रतिबंधित आहेत, त्यात दंड, तुरूंगवास, फटके, मृत्युदंड अशा शिक्षा होऊ शकतात.

पाकिस्तान- पाकिस्तानात १९७९ च्या  हुदूद वटहुकमानुसार व्यभिचार हा गुन्हा आहे. या वादग्रस्त कायद्यानुसार एखाद्या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यास चार प्रौढ साक्षीदार आणावे लागतात. त्यामुळे तिच्यावरचा व्यभिचाराचा आरोप टळतो.

दक्षिण कोरिया- २०१५ मध्ये दक्षिण कोरियात व्यभिचार हा गुन्हा नाही असे ठरवण्यात आले. आधीच्या कायद्यानुसार या गुन्ह्य़ात तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होती.  तैवान- या देशात व्यभिचार हा गुन्हा असून त्यासाठी एक वर्ष तुरूंगवासाची शिक्षा आहे. पण यात दोघांनाही शिक्षा केली जाते. तैवानी पुरूष जर व्यभिचारात पकडला गेला तर माफी मागतो, मग त्याची पत्नी त्याला माफ करते कारण पुरूषच कुटुंबाची रोजीरोटी कमावत असतो. पण त्यांनी माफी मागितली नाही तर पतीला कोर्टात खेचले जाते.

अमेरिका- येथील वीस राज्यांत अजूनही व्यभिचार हा गुन्हा आहे, पण सहसा त्यात गुन्हेगारी खटले भरले जात नाहीत. यात नोकरीतून काढणे, काही र्निबध घालणे, पदावनती करणे अशा शिक्षा दिल्या जातात.