बिहारमधील महाबोधी मंदिरात हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना असल्याची पूर्वसूचना केंद्रीय गुप्तचर विभागाने बिहार पोलीस व केंद्रीय यंत्रणांना दिली होती. मात्र, त्यानंतरही योग्य खबरदारी न घेतली गेल्याने दहशतवाद्यांचा कट यशस्वी झाल्याचा सूर उमटत आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले असून, दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद व पुणे या शहरात बौद्ध धार्मिक स्थळे व तिबेटी वसाहतींना सुरक्षा देण्यास सांगितले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या बौद्ध भिख्खूंची नावे तेनझिंग लामा व बाला सांगा अशी आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बोधगया येथील महाबोधी मंदिर व बोधीवृक्षाच्या दर्शनासाठी श्रीलंका, चीन, जपान व व्हिएतनाम अशा अनेक देशांतून बौद्ध यात्रेकरू येत असतात. सकाळच्या वेळी हे स्फोट झाल्याने प्राणहानी टळली असे सांगण्यात येते. सकाळी महाबोधी मंदिराच्या संकुलात चार बॉम्बस्फोट झाले, तर करमापा धर्मशालेत तीन बॉम्बस्फोट झाले. बुद्धाच्या ऐशी फूट उंचीच्या पुतळ्याजवळ प्रत्येकी एक-एक, तर वळण रस्त्याजवळच्या बस स्थानकाजवळ एक असे बॉम्बस्फोट झाले, असे मगध परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक नय्यर हुसनेन खान यांनी पीटीआयला सांगितले. सकाळी ५.३० ते ५.५८ दरम्यान हे स्फोट झाले. नवी दिल्ली येथे गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी सांगितले की, बिहारमधील महाबोधी मंदिर व आजूबाजूच्या परिसरात झालेले बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला होता. एनआयए व एनएसजी यांची पथके तेथे तपासासाठी पाठवण्यात आली आहेत.
महाबोधी मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद सिंग यांनी सांगितले की, दोन जखमींमध्ये एक म्यानमारचा, तर एक तिबेटचा भाविक आहे. त्यांना मगधच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सिंग म्हणाले की, बुध्दाच्या ऐंशी फुटी पुतळ्याजवळ लावण्यात आलेले दोन बॉम्ब निकामी करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस.के.भारद्वाज यांनी सांगितले की, ते कमी तीव्रतेचे टाइम बॉम्ब होते. महाबोधी मंदिरात हल्ला होणार असल्याची माहिती सहा-सात महिन्यांपूर्वी मिळाली होती, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
बोधीवृक्ष सहिसलामत
बोधगया मंदिराजवळ पोलिस सुरक्षा व्यवस्था ही बाहेरच्या भागात आहे. अंतर्गत भागाची सुरक्षा मंदिराचे विश्वस्त अधिकारी पाहतात. महाबोधी मंदिराचा गाभारा सहीसलामत असून मंदिराचा परिसर या हल्ल्यानंतर स्वच्छ करण्यात आला आहे. बोधगया समितीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात एकूण चार स्फोट झाले. सुदैवाने बोधी वृक्षाला व मंदिराला हानी पोहोचली नाही. बोधी वृक्षाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात तेथील टेबल वर उडाले, त्यात दोन जण जखमी झाले. दुसरा बॉम्बस्फोट हा पुस्तके ठेवली होती त्या भागात झाला. त्यात फर्निचरचे नुकसान झाले; पुतळे व इतर स्मृती वस्तूंचे नुकसान झाले नाही.
पंतप्रधान-राष्ट्रपतींकडून निषेध
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या स्फोटांचा निषेध केला असून धार्मिकस्थळी असे हल्ले कदापि खपवून घेतले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली व या ठिकाणाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्याची मागणी केली. या साखळी बॉम्बस्फोटांचा आपण तीव्र निषेध करतो, कोटय़वधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी लोकांमध्ये भीती पसरवण्याचा उद्देश यामागे असावा असे ते म्हणाले.