पंतप्रधानांची घोषणा; १४ एप्रिलला योजनेची सुरुवात
शेतात पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळावा, शेतमाल देशात कुठेही विकता यावा यासाठी महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेदरम्यान कृषी बाजाराची संगणक पेठ (अ‍ॅग्री मार्केट प्लॅटफॉर्म) सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिलपासून या योजनेला सुरुवात होणार आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचे केंद्राचे लक्ष्य असून त्यासाठी कसून प्रयत्न केले जातील असा निर्धारही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधानांनी पीक विमा योजनेच्या वैशिष्टय़ांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने शेती करावी असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. योजनेच्या वैशिष्टय़ांबरोबरच सेंद्रिय शेती, पंतप्रधान सिंचन योजना या मुद्दय़ावरही मोदी यांनी विवेचन केले. काबाडकष्ट करूनही कृषीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे सरकारने कृषी बाजाराची संगणकीय पेठ सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्याची सुरुवात होईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. यातून शेतकऱ्यांना मोबाइल फोनच्या आधारे देशात ज्या ठिकाणी दर जास्त आहे तिथे आपला माल विकता येईल.
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष २०२२ मध्ये आहे. तोपर्यंत कृषी उत्पन्न दुप्पट कसे होईल यादृष्टीने शेतकरी तसेच राज्यांनी पावले उचलावीत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

ई-अ‍ॅग्री प्लॅटफॉर्म काय आहे?
* देशातील ५८५ कृषी बाजार समित्या २०१८ पर्यंत टप्प्याटप्प्याने जोडणार
* पहिल्या टप्प्यात २०० कृषी समित्या एकमेकांशी जोडणार
* त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

१४ एप्रिल रोजी राष्ट्रीय कृषी बाजारपेठेची स्थापना करण्यात येईल. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मोबाइल फोनच्या साह्य़ाने या सुविधेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान.