दुबईतून भारतात आणताच ‘ईडी’कडून अटक

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या घोटाळ्यात पाहिजे असलेला दुबईतील एक उद्योजक आणि हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ अशा दोघांना गुरुवारी भारतात प्रत्यार्पित करण्यात आल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना अटक केली. यामुळे उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराचा तपास करणाऱ्या यंत्रणांचे मनोधैर्य उंचावले आहे.

३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी चॉपर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात हवा असलेला उद्योजक राजीव समशेरबहादूर सक्सेना आणि विदेशातून आपल्या स्वयंसेवी संस्थेला मदतीपोटी मिळालेल्या सुमारे ९० कोटी रुपयांचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयला हवा असलेला लॉबिस्ट दीपक तलवार या दोघांना दुपारी दीड वाजताच्या सुमारास विशेष विमानाने दुबईहून दिल्लीला आणण्यात आले. ईडीने लगेच या दोघांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) अटक केली.

राजीव सक्सेना याला विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्यापुढे हजर करण्यात आले असता त्यांनी सक्सेनाची चार दिवसांकरता ईडीच्या कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील सहआरोपी आणि कथित दलाल असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिस्तियन मिशेल यालाही गेल्या डिसेंबरमध्ये दुबईहून प्रत्यार्पित करण्यात आले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

दीपक तलवार याच्यावरील आरोप

तलवार याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि रुग्णवाहिका व इतर गोष्टींसाठी युरोपमधील आघाडीच्या क्षेपणास्त्र उत्पादक कंपनीकडून त्याच्या स्वयंसेवी संस्थेला मिळालेल्या ९०.७२ कोटी रुपयांचा गैरवापर करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. ईडी व सीबीआयने भ्रष्टाचाराच्या फौजदारी प्रकरणांसाठी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, तर प्राप्तिकर खात्याने त्याच्यावर करचोरीचा आरोप ठेवला आहे.