पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरूवारी तीन सुवर्ण योजनांचे उदघाटन करण्यात आले. सुवर्ण रोखे, सुवर्ण ठेव आणि सोन्याची नाणी अशा योजनांतून देशात पडून राहिलेले सोने चलनात आणण्याचा या योजनांमागील उद्देश आहे.

प्रत्यक्ष सोने खरेदीला उपाय म्हणून सुवर्ण रोखे (गोल्ड बॉन्ड) योजना तर देशातील घराघरांमध्ये पडून राहिलेला सोन्याचा साठा चलनात आणण्यासाठी ‘सुवर्ण ठेव’ योजना सादर करण्यात आली आहे. त्यासोबतच सरकारने अशोक चक्र आणि महात्मा गांधींची मुद्रा असलेली सोन्याची नाणी सादर करण्यात आली. लवकरच ही नाणी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या तीन योजनांना ‘सोने पे सुहागा‘ अशी उपमा देत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या सुवर्ण योजना देशातील नागरिकांना फायदेशीर ठरतील असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. तसेच देशात २० हजार टन सोने पडून असल्याची माहिती देत नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर करण्यात आलेल्या तीन सुवर्ण योजनांमुळे देशाला सुवर्णयुगाच्या दिशेने जाता येईल, असा विश्वास व्यक्त केला.