अल काईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याच्या पाकिस्तानातील अबोटाबादमधील निवासस्थानी छापा टाकून त्याला ठार करण्याच्या कारवाईत सहभागी असलेल्या नौदलाच्या माजी सैनिकाने जे पुस्तक लिहिले होते त्याच्या विक्रीतून येणाऱ्या ७० लाख डॉलर्सच्या मानधनावर पाणी सोडण्याचे त्याने मान्य केले आहे. प्रकाशनापूर्वी परवानगी न घेतल्याच्या प्रकरणात हे पुस्तक वादग्रस्त ठरले असून त्यामुळे नौदल सैनिक मॅथ्यू बिलॉनेट याच्यावर खटला भरला जाण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याने या पुस्तकाच्या विक्रीतून आलेले पैसे अमेरिकी सरकारला देण्याचे मान्य केले आहे. अमेरिकी न्याय खात्याने केलेल्या आरोपानुसार नौदल सैनिकाने हे पुस्तक लिहिताना त्याची कच्ची प्रत न्याय खात्याकडे बघायला दिली नव्हती. बिसॉनेट याने अमेरिकी सरकारला या पुस्तकातून मिळणारे पैसे देण्याचे मान्य केले आहे. त्याने ‘नो इजी डे’ हे पुस्तक लिहिले असून त्यात लादेनवरील कारवाईचे थरारक वर्णन देण्यात आले आहे, असे न्याय खात्याचे प्रवक्ते निकोल नवस यांनी सांगितले. तडजोडीचा उपाय म्हणून बिसॉनेट याने चूक मान्य करून ६७ लाख डॉलर्स व इतर रक्कम सरकारला देण्याचे मान्य केले. सरकारची खटल्याची फी १३ लाख डॉलर्सही त्याला द्यावी लागणार आहे, असे एबीसी न्यूजने म्हटले आहे. बिसॉनेट याने ‘मार्क ओवेन’ या टोपण नावाने हे पुस्तक लिहिले होते. त्याने सरकारला १ लाख अमेरिकी डॉलर्स पेंटगॉनला माहिती न देता पुस्तक  लिहिल्याबद्दल देण्याचे मान्य केले आहे. त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर माजी नौदल सैनिकावर न्याय खात्याने खटला भरला होता, त्याने महत्त्वाची माहिती उघड न करण्याच्या कराराचा भंग केला असा आरोप त्याच्यावर होता. असे असले तरी त्याने वर्गीकृत माहिती जाहीर केलेली नाही व राष्ट्रीय सुरक्षेत बाधा येईल असे काही केलेले नाही. लष्कराशी कराराचे उल्लंघन केले आहे. बिसॉनेट याने पुस्तकाची कच्ची प्रत सादर न केल्याबाबत माफी मागितली आहे. मी गंभीर चूक केली आहे ती पुन्हा कुणी करू नये, असे बिसॉनेट याने सांगितले आहे.