अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या मृत्यूसंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. जयललिता यांच्यावर उपचार सुरु असताना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, अशी माहिती अपोलो रुग्णालयाने दिली.

चेन्नईत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अपोलो रुग्णालयाने जयललिता यांच्यावरील उपचारादरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा खुलासा केला. अपोलोचे अध्यक्ष प्रताप सी रेड्डी म्हणाले, जयललिता यांच्या मृत्यूबाबत चौकशी करणाऱ्या समितीला रुग्णालयातर्फे सर्व माहिती देण्यात आली आहे. जयललिता यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. आयसीयूत त्या एकट्याच रुग्ण होत्या. जयललिता यांच्यावरील उपचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊ नये यासाठी कॅमेरे बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात तुरुंगात असलेल्या शशिकला यांनी चौकशी समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले होते. ‘जयललिता २२ सप्टेंबर २०१६ रोजी घरात भोवळ येऊन पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात भरती होण्यास नकार दिला होता, असा दावा शशिकलांनी केला होता. ‘ बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामुळे जयललिता यांना मानसिक धक्का बसला होता, असेही त्यांनी म्हटले होते. तसेच रुग्णालयात उपचारादरम्यान ओ. पनीरसेल्वम व एम. तम्बीदुराई यांनी जयललिता यांची भेट घेतली होती, असेही त्यांनी म्हटले होते. शशिकला यांच्या ५५ पानी प्रतिज्ञापत्राचे तामिळनाडूच्या राजकारणात पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर अपोलो रुग्णालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.