दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली-नोएडा हे अंतर कमी वेळात पार करण्यासाठी उड्डाण पुलावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. अलाहाबाद न्यायालयाने दिल्ली- नोएडा- दिल्ली (डीएनडी) उड्डाण पूलावरुन होणारी वाहतूक करमुक्त करण्याचा आदेश बुधवारी दिला. त्यामुळे आता दिल्ली ते नोएडा यांना जोडणाऱ्या उड्डाण पूलावरुन प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार नाहीत. या पूलावरून प्रवास करण्यासाठी कार चालकांना २८ रुपये तर दुचाकी स्वारांकडून १२ रुपये टोल आकारला जात होता. पूलाच्या बांधकामाचा खर्च वसूल झाल्यानंतर नागरिकांकडून टोलच्या स्वरुपात रक्कम आकारणे योग्य नसल्याचे सांगत न्यायालयाने कर रद्द करण्याचे आदेश उत्तरप्रदेश सरकार आणि नोएडा पूलाचे काम करणाऱ्या कंपनीला दिले आहेत.
दिल्ली ते नोएडा यांना जोडणाऱ्या या उडाण्ण पूल जवळजवळ ९ किलोमीटर अंतराचा आहे. १९९७ पासून प्रवाशांसाठी हा पूल खुला करण्यात आला. या पूलासाठी तब्बल ४०७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. २००१ पासून या पूलावर वाहतूक नियंत्रण कक्ष देखील सुरु करण्यात आले आहे. एका अनुमानानुसार, या उड्डाण पूलाचा ठेका घेणाऱ्या नोएडातील कंपनीने २ हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम कर स्वरुपात वसुली केली आहे. मात्र असे असताना कंपनीने करवसुली सुरुच ठेवली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2016 5:14 pm