विद्वान, संशोधक, विचारगट आणि माध्यम संस्था यांच्यासह समाजावर प्रभाव टाकणारे किमान २०० लोक, तसेच महत्त्वाची राजनैतिक पदे भूषवलेले भारतीय विदेश सेवेचे ४० विद्यमान व सेवानिवृत्त अधिकारी यांची नावे चीनच्या झेनुआ डाटा या कंपनीने तयार केलेल्या ओव्हरसीज की इन्फर्मेशन डाटाबेसमध्ये समाविष्ट होती, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या तपासात आढळले आहे.

विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्यापासून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेले भारताचे इस्रायलमधील राजदूत संजीव सिंगला यांच्यापर्यंतचे अधिकाऱ्यांवर या चिनी कंपनीने पाळत ठेवली होती. याशिवाय या कंपनीने हेरगिरी केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. गुरुमूर्ती आणि संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त निरीक्षण पथकाचे सदस्य ए. गोपीनाथन यांचा समावेश आहे.

दरम्यान, या कंपनीचे व्यवहार बेकायदेशीर नसले, तरी फेसबुकने शेंझेन झेनुआ डाटा टेक्नॉलॉजीला आपल्या व्यासपीठावर बंदी घातली आहे.

या कंपनीने ज्या रीतीने सार्वजनिक माहितीसोबत छेडछाड केली आहे, ते आमच्या धोरणाच्या विरोधात आहे. सार्वजनिक माहितीही अशा रीतीने गोळा केली जायला नको. मात्र, आपण या कंपनीवर केव्हा बंदी घातली किंवा तसे पत्र पाठवले याबद्दल फेसबुकच्या प्रवक्त्याने काही सांगितले नाही.