अमेरिकेची अर्थव्यवस्था करोना र्निबधानंतर पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेवर सल्लामसलतीसाठी नेमलेल्या सल्लागार गटात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा अमेरिकी भारतीय उद्योगधुरिणांची नेमणूक केली आहे. गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई व मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांचा त्यात समावेश आहे.

देशातील बुद्धिमान व्यक्तींचा सल्ला आम्ही अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करताना घेत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाची असून करोनामुळे ३३ कोटी लोकांपैकी ९७ टक्के लोकांना घरातच थांबण्यास सांगण्यात आल्याने अमेरिकेतील अर्थचक्र थांबले असून १.६० कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत.

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी देशातील उद्योग व विविध क्षेत्रातील दोनशे धुरिणांचा समावेश असलेले सल्लागार गट तयार केले आहेत.  हे सर्वजण अर्थव्यवस्था सुरळित करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांना शिफारशी करणार आहेत. या व्यक्तींकडून काही नव्या कल्पना मांडल्या जाणे अपेक्षित आहे, असे त्यांनी व्हाइट हाऊस येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

पिचाई व नाडेला यांच्याशिवाय आयबीएमचे अरविंद कृष्णा, मायक्रॉनचे संजय मेहरोत्रा यांचा तंत्रज्ञान क्षेत्राशी सल्लागार गटात समावेश असून त्यात अ‍ॅपलचे टिम कुक, ओरॅकलचे लॅरी एलीसन, फेसबुकचे मार्क झकरबर्ग यांनाही स्थान मिळाले आहे. उत्पादन क्षेत्राशी संबंधित गटात पेरनॉड रिकार्डमधील भारतीय अमेरिकी अधिकारी अ‍ॅन मुखर्जी यांचा समावेश केला असून त्यात कॅटलपिलरचे जिम उमप्लेबाय, टेस्लाचे इलन मस्क, फियाट ख्रिस्लरचे माइक मॅन्ली, फोर्डचे बिल फोर्ड व जनरलच्या मेरी बॅरा हेही आहेत. आर्थिक सेवा सल्लागार गटात मास्टर कार्डचे अजय बंगा, व्हिसाचे एल केली, ब्लॅकस्टोनचे स्टीफन श्वार्झमन, फिडेलेटीचे अबिगेल जॉन्सन, इन्टय़ुइटचे सासन गुडार्झी यांचा समावेश आहे.