News Flash

लोकसभेत अराजक!

जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकशाहीतील सर्वोच्च सभागृहात गेलेल्या खासदारांनी गुरुवारी या आदर्श रचनेला बट्टा लावला.

| February 14, 2014 01:55 am

जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकशाहीतील सर्वोच्च सभागृहात गेलेल्या खासदारांनी गुरुवारी या आदर्श रचनेला बट्टा लावला. तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी मांडण्यात आलेल्या आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकावरून गुरुवारी लोकसभेत या राज्यातील खासदारांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळाने कोटय़वधी भारतीयांचीच नव्हे तर लोकशाहीचीही मान शरमेने झुकवली. काळी मिरीच्या पावडरची फवारणी, अध्यक्षांच्या टेबलावरील काचेची मोडतोड आणि हाणामारी अशा हुल्लडबाजीचे दर्शन घडवत या लोकप्रतिनिधींनी संसदीय व्यवस्थेत काळा इतिहास रचला. हा कलंक लावण्यात ‘मोलाची’ भूमिका बजावणाऱ्या आंध्र प्रदेशमधील १८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशच्या विभाजनासंबंधीच्या या विधेयकावरून संसदेच्या चालू अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गदारोळ सुरू आहे. त्या गदारोळाने गुरुवारी परिसीमा गाठली. हे विधेयक मांडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे लोकसभेच्या सभागृहात उभे राहिल्यावर विजयवाडाचे काँग्रेसमधील निलंबित खासदार राजगोपाल यांनी लोकसभेत काळीमिरीचा स्प्रे फवारला. त्यांच्या या कृत्यामुळे तेलंगणाविरोधक व समर्थकांमध्ये लोकसभेत अक्षरश हाणामारी सुरू झाली. टीडीपी सदस्य वेणूगोपाल यांनी सभापतींचा माईकच उखडून टाकला. त्यांच्या हाती चाकू असल्याची अफवा पसरल्याने गोंधळात भर पडली. एकीकडे हा प्रकार सुरू असताना ‘स्प्रे’ मुळे अनेक खासदारांना अस्वस्थ वाटू लागले.  अनेक सदस्यांचे डोळे चुरचुरू लागले. काहींना घशात जळजळ सुरू झाली. इंदौरच्या भाजप खासदार सुमित्रा महाजन यांच्यासह अन्य दोन सदस्यांना नजीकच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर ते रुग्णालयातून घरी गेले.
या प्रकारानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतरही कामकाज सुरू होण्यापूर्वीच सर्वच्या सर्व निलंबित खासदार सभागृहात दाखल झाले. त्यांची निदर्शने कायम राहिल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
भाजपची उलटी खेळी
एकीकडे, सोमवारी तेलंगणा विधेयकावर चर्चा करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले असताना भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी लोकसभा सभापतींची भेट घेऊन हे विधेयक मांडले गेल्याचे आपण मान्य करत नाही, असे म्हटले. त्यामुळे सरकारसमोर तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. तेलंगणावरून निर्माण झालेल्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना सहकार्य करणार नसल्याची घोषणा विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. त्या म्हणाल्या की, अर्थसंकल्प मंजूर करवून तणाव निवळल्यानंतरच तेलंगणा विधेयक सादर करावे, अशी विनंती आम्ही केली होती.
सदनात मिरपूड फेकण्याचा प्रकार लाजिरवाणा आहे. त्यामुळे आज आपल्या लोकशाहीला कलंक लागला आहे.   
मीरा कुमार, लोकसभा अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:55 am

Web Title: anarchy in parliament cong mp sprays pepper 16 anti telangana mps suspended
टॅग : Telangana Crisis
Next Stories
1 काँग्रेसची दुहेरी कोंडी..
2 लोकसभा निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ
3 ‘जनलोकपाल’बाबत ‘आप’च्या भूमिकेला काँग्रेस, भाजपचा विरोध
Just Now!
X