तीनही सेनादलांच्या प्रमुखांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांशी नियमितपणे संवाद साधणे गरजेचे आहे. संरक्षणाच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांशी चर्चा करण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे तसे होताना दिसत नाही असे स्पष्ट मत हवाई दलाचे माजी प्रमुख अनिल टिपणीस यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण छावण्यांना लक्ष्य करण्याची आपली क्षमता असून त्यासाठी सीमा ओलांडण्याचीही गरज नसल्याचे टिपणीस यांनी स्पष्ट केले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टिपणीस यांनी पंतप्रधान व संरक्षण दलांचे प्रमुख यांच्यातील नियमित संवादाविषयी मते व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘तीनही सेनादलांचे प्रमुख संरक्षणाच्या मुद्दय़ांवरून पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांशी नियमितपणे संवाद साधू शकतात. मात्र, आपले तीनही सेनादलांचे प्रमुख पंतप्रधानांना भेटत नाहीत. अमेरकेचे अध्यक्ष मात्र कायम त्यांच्या सेनादल प्रमुखांच्या संपर्कात असतात. अगदी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेल्या लष्करी कमांडर्सच्याही ते व्यक्तिगतरित्या संपर्कात असतात’.
छावण्यांना लक्ष्य करा
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला तोंड देताना त्या देशातील दहशतवादी प्रशिक्षण छावण्यानांच लक्ष्य केले पाहिजे असे टिपणीस म्हणाले. छावण्या उद्ध्वस्त करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याची गरज नाही. तंत्रज्ञानाच्यऋ मदतीने भारतीय हवाई दल या छावण्या सहज उद्ध्वस्त करू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अचूक हल्ल्यासांठी मानवी पातळीवर वास्तव पद्धतीने गुप्तचर माहिती गोळा केलेली असणे गरजेचे असल्याचेही त्यांना अधोरेखित केले. आपल्याकडची गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानइतकीही चांगली नाही, असे टिपणीस म्हणाले. पूँछमधील पाकिस्तानी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री अँटनी यांनी संसदेत जी परस्परविरोधी वक्तव्ये केली त्याचा फायदा शत्रूला मिळतो पाकिस्तानबाबत आपण कायमच नरमाईची भूमिका घेत असतो.  केवळ गुळमुळीत प्रतिक्रिया देण्यापेक्षा भारताने आक्रमक रहावे, असे टिपणीस अखेरीस म्हणाले.