केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून भारतीय लष्कराकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. जवानांनी आपलं सामर्थ्य आणि कौशल्य वापरत वंदूर भागात वाहून गेलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पूल बांधला आहे. यासाठी जवानांनी कोसळलेल्या झाडाच्या फांद्या आणि बुंध्याचा वापर केला आहे. लष्करी जवानांनी पूल बांधण्यासाठी स्थानिक लोकांचीही मदत घेतली. जवानांनी बांधलेल्या या पुलामुळे बचावकार्यात मोठी मदत होत आहे.

भारतीय लष्कराने काही फोटो शेअर केले असून यावेळी ऑपरेटर आदर्श मोहन यांचंही कौतूक केलं आहे. आदर्श मोहन यांनी मोठी हिम्मत दाखवत नदीच्या दुसऱ्या टोकाला असणार किनारा गाठला आणि पूल पुर्ण करण्यास मदत केली.

दुसऱ्या एका घटनेत मुन्नार येथील पल्लीवसाल येथे जमीन धसल्याने संपूर्ण रस्ता नाहीसा झाला होता. यावेळी मद्रास रेजिमेंटच्या जवानांनी तेथील हॉटेलमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांची तात्पुरता पूल बांधत सुटका केली होती. लष्कराने केरळमधील बचावकार्याला ‘ऑपरेशन सहयोग’ असं नाव दिलं आहे.