केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर मंगळवारी न्यूयॉर्क येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अरुण जेटली (६६) १३ जानेवारीला वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

सॉफ्ट टिश्यूच्या कॅन्सरसंबंधी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. गतवर्षी जेटली यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बुधवारी रेल्वे आणि कोळसा खात्याचे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला. ते हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.

येत्या १ फेब्रुवारीस हंगामी अर्थसंकल्प सादर होणार आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पीयूष गोयल यांच्याकडे हंगामी अर्थ आणि कार्पोरेट मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार दिल्याचे राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही दोन्ही मंत्रालये जेटलींकडे होती.