देशाला कायमच अरुण जेटली यांची उणीव भासेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेतली त्यांची भाषणं कायम स्मरणात राहतील. सुषमा स्वराज आणि त्यापाठोपाठ अरुण जेटली यांचं जाणं पक्षावर वज्राघातासारखं आहे. अरुण जेटली यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना मी करतो असंही गडकरींनी म्हटलं आहे. अरुण जेटली यांच्या निधनाचं वृत्त समजताच काय प्रतिक्रिया द्यायची ते कळत नाही मी निशब्द झालो आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. ट्विट करुन नितीन गडकरी यांनी अरुण जेटलींना आदरांजली वाहिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. ९ ऑगस्टपासून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काहीतरी किमया घडेल आणि जेटली यांचे प्राण वाचतील अशी अपेक्षा भाजपातल्या सगळ्याच नेत्यांना होती. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह भाजपातल्या दिग्गज नेत्यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली होती. मात्र आज अखेर दुपारी १२ वाजून ७ मिनिटांच्या सुमारास अरुण जेटली यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर भाजपातल्या आणि इतर पक्षातल्या नेत्यांनीही अरुण जेटली यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं आहे.