आसामच्या कारबी अँगलाँग जिल्ह्य़ात जादूटोण्याच्या संशयावरून संतप्त जमावाने एका महिलेसह दोनजणांना ठेचून मारले. नंतर त्यांचे शिर धडावेगळे करून जाळून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हे दोनजण काळी जादू करीत असल्याचा लोकांचा संशय होता. त्यांच्यामुळेच डोकमोका येथील रोहिमापूर येथे एका मुलीचा मृत्यू झाल्याचे लोकांचे म्हणणे होते. गुरुवारी ही घटना उघड झाल्यानंतर नऊजणांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधीक्षक देबाजित देऊरी यांनी दिली.

२९ सप्टेंबरला रश्मी गौर या किशोरवयीन मुलीचा रोहिमपूर येथे मृत्यू झाला होता. तिने मृत्यूपूर्वी जादूटोणा करणाऱ्या दोघांमुळे आजारी पडल्याचे सांगितले होते. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आणखी एका मुलीने या दोघांवर असाच आरोप केला होता. ती मुलगी गावप्रमुखाच्या घरातील होती. दोघांनी आपल्यावरही काळी जादू केली असे तिचे म्हणणे होते. नंतर ग्रामस्थांनी रामवती हालुआ व बिजॉय गौर यांना ठेचून मारले. त्यांचे मृतदेह डोंगराकडे नेले. तेथे त्यांचे शिर धडावेगळे करून रश्मी गौर हिच्यावर जिथे अंत्यसंस्कार केले तिथेच त्यांचे मृतदेह पेटवून दिले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी व कार्यकारी दंडाधिकारी जिंतू बोरा यांनी घटनास्थळी भेट देऊन चितेतील अवशेष व मातीचे नमुने घेतले. याबाबत नऊजणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.