11 December 2017

News Flash

रक्ताच्या कर्करोगावरील औषधात सापडणारे संयुग अस्थम्यावरील उपचारात प्रभावी

मूळ रक्ताच्या कर्करोगावर उपचारासाठी विकसित केलेले औषध अस्थम्यावर गुणकारी असल्याचे नवीन संशोधनात दिसून आले

मेलबर्न, पीटीआय | Updated: January 28, 2013 5:22 AM

मूळ रक्ताच्या कर्करोगावर उपचारासाठी विकसित केलेले औषध अस्थम्यावर गुणकारी असल्याचे नवीन संशोधनात दिसून आले आहे. अस्थम्याच्या केवळ लक्षणांवर नव्हे तर तो ज्या क्रियांमुळे होतो त्याला रोखण्याचे काम या औषधांमुळे होत असल्याचे दिसून आले आहे.
अस्थम्याचा अ‍ॅटक हा फुफ्फुसातील दोन प्रथिनांमुळे येतो, असे दिसून आले असून ही प्रथिने जेव्हा सर्दीच्या विषाणूंशी किंवा धुळीतील माइट्सच्या संपर्कात येतात तेव्हा अस्थमा ज्या क्रियांमुळे होतो त्या घडून येतात.
अभ्यासात असे दिसून आले, की रक्ताच्या कर्करोगावर तयार करण्यात आलेल्या औषधातील संयुगामुळे अस्थम्याच्या अ‍ॅटकवेळी निष्क्रिय होणारी प्रथिने सक्रिय बनतात. याचा अर्थ यापुढे डॉक्टर अस्थम्याच्या केवळ लक्षणांवर नव्हे तर तो ज्यामुळे होतो त्या मूळ प्रक्रियेवर उपचार करू शकतील. विकसित देशात अस्थमा हा प्रमुख आजार आहे, त्याची लक्षणे नष्ट करणारे संयुग सापडणे ही फार दुर्मिळ बाब आहे असे या औषधातील या संयुगाचा अस्थम्यावर होणारा उपचार शोधून काढणारे डॉ. अँथनी डॉन यांनी सांगितले. या संयुगाने केवळ लक्षणांवर नव्हे तर अस्थम्याच्या मूळ कारणांवरच इलाज केला जातो असे त्यांनी स्पष्ट केले. स्कूल ऑफ केमिस्ट्रीचे सहायक प्राध्यापक जोनाथन मॉरिस यांनी या संयुगाचे संश्लेषण केले आहे. अस्थम्याच्या अ‍ॅटॅकवरचे उपचार फारच ढोबळ पद्धतीने केले जातात. त्यात तो विषाणूमुळे आलेला अ‍ॅटॅक आहे, की अ‍ॅलर्जीकारकांमुळे आलेला अ‍ॅटक आहे याचा विचार केला जात नाही. सध्याच्या उपचारपद्धतीत विषाणूशी संबंधित अस्थम्यावर फारसा प्रभाव पडत नाही. ‘जर्नल नेचर मेडिसीन’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.

First Published on January 28, 2013 5:22 am

Web Title: asthma cure discovered via leukaemia say researchers