भारतीय राजकारणातील युगपुरूष माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध होते. आपल्या वाणीने ते विरोधकांपासून श्रोत्यांपर्यंत सर्वांनाच खिळवून ठेवत. वाजपेयींना शालेय जीवनापासूनच भाषणं करण्याचा छंद होता. त्यांनी शाळेत असतानाच वादविवाद, कविता वाचन आणि वक्तृत्वाच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. ते एक प्रखर वक्ते आणि कवी होते. त्यांच्या वडिलांकडूनच त्यांना हे गुण मिळाले होते.

अटलजी देशातील मोजक्या राजकारण्यांपैकी एक होते की ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी संसदेपासून ते सडकपर्यंत लोक वाट पाहायचे. १९५७ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा बलरामपूर मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे भाषण ऐकून हा मुलगा एक दिवस देशाचा पंतप्रधान होईल, असे म्हटले होते. अटलजी जेव्हा जनता पक्षाच्या सरकारमध्ये विदेश मंत्री झाले तेव्हा संयुक्त राष्ट्र संघात हिंदीत भाषण करणारे ते पहिले नेता ठरले होते. अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी विरोधी पक्षातील लोकही त्यांच्या सभेला जात. अटल बिहारी बोल रहा है, इंदिरा शासन डोल रहा है.. ही घोषणाच आणीबाणीनंतर देशात प्रसिद्ध झाली होती.

वाजपेयी हे अत्यंत मजेशीर पद्धतीने भाषण करत. त्याकाळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणात एकमेकांबाबत तणाव दिसून यायचा. वाजपेयी खूप हात हालवत बोलतात, असे इंदिरा गांधी यांनी वाजपेयींवर टीका करताना म्हटले होते. त्यावर उत्तर देताना वाजपेयी यांनी अत्यंत मजेशीर उत्तर दिले होते. हे सर्व ठीक आहे, पण तुम्ही कोणाला पाय हलवत भाषण देताना ऐकलंय का, असा टोला लगावला होता.

आणीबाणीच्या काळात वाजपेयी कारागृहात होते. दुसरीकडे इंदिरा गांधी यांनी निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर अटलजींसह सर्वांना कारागृहातून सोडण्यात आले. निवडणूक प्रचारासाठी अत्यंत कमी वेळा होता. दिल्लीमध्ये प्रचारसभा होती. जनता पक्षाच्या नेत्यांनी भाषणं दिली. त्यावेळी कडाक्याची थंडी होती. हलकासा पाऊसही पडत होता. तरीही प्रचारसभेत आलेले लोक जागेवरून हलले नव्हते. रटाळ भाषण, पाऊस सुरू असूनही हे लोक का जात नाहीत, असा सवाल एका नेत्याने शेजारील नेत्याला विचारलाही. त्यावेळी त्या नेत्याने वाजपेयींचे भाषण अजून व्हायचे आहे त्यासाठी हे लोक थांबलेत. भूकंप आला तरी ते जागेवरून उठणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

बाबरी मशीद विध्वंसावेळी वाजपेयींनी केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. बाबरी मशीद पाडण्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे ५ डिसेंबर १९९२ रोजी लखनऊ येथील व्यासपीठावर बोलताना वाजपेयी म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला कार सेवा करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे तो थांबवण्याचा प्रश्नच नाही. उद्या कार सेवा केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाची अवहेलना होणार नाही. कार सेवा करून सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान केला जाईल. मला अयोध्येला जायचं आहे. पण मला जाऊ दिलं जात नाही.