भारतीय राजकारणाला जर आकाशाची उपमा दिली तर त्या आकाशात सर्वाधिक उजळ तारा म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होते. या ताऱ्याचा आज अस्त झाला आहे. मात्र वाजपेयी यांची कारकीर्द त्यांचे देशासाठीचे योगदान कधीही विसरता येणार नाही अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अटलजी हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. त्याचमुळे विरोधकही त्यांचा आदर करत असत. तुम्ही आजही विरोधकांचे मत जाणून घेतलेत तरीही त्यांच्या बोलण्यातून आदरच व्यक्त होईल, यात काहीही शंका नाही असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे. त्यांचे राजकारण हे सर्वसमावेशक होते, कार्यकर्त्यांच्या मनात ते कायम आत्मविश्वास निर्माण केला.

साहित्य क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्याचप्रमाणे सामाजिक आयुष्यातही ते महान होते. त्यांच्यासारखे संघटन कौशल्यही असणेही दुर्मीळच आहे असेही महाजन यांनी स्पष्ट केले. सामान्य कार्यकर्त्यापासून अगदी नेत्यापर्यंत ते सगळ्यांना आपलेसे वाटत. त्यांचा स्वभावच तितका मनमिळाऊ आणि प्रभावी होता. ते जेव्हा परदेशात दौरे करत तेव्हाही त्यांच्या वक्तव्याकडे त्या देशाच्या प्रतिनिधींचे विशेष लक्ष असे. वाजपेयी जे बोलतील त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडत असे. असा गुण खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळतो असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज एम्स रूग्णालयात निधन झाले. साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहे. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी संध्याकाळी ५.५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.