लॉकडाउनचा कालावधी वाढल्यानंतर देशभरातून लाखो मजुरांनी घराकडे स्थलांतर सुरू केलं आहे. या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. त्याचबरोबर या मजुरांना जेवणाची व्यवस्था केली जात असून, घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या रोजगारांसाठी केंद्रानं उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याची माहिती दिली.

२० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून दिल्या जाणाऱ्या मदतीची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. “आजच्या स्थितीला देशातील वेगवगेळ्या शहरात काम करणारे मजूर घरी जात आहे. त्यांच्या प्रवासाची सोय विशेष रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या तिकिटाचा ८५ टक्के खर्च केंद्रानं उचलला आहे. मजुरांना थेट मदतही देण्यात आली आहे,” असं सीतारामन म्हणाल्या.

“घरी परतल्यानंतर या मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. या मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी सरकारनं मनरेगा योजनेसाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे,” असं सीतारामन म्हणाल्या.

“मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार निर्मितीचं कामं केलं जाईल. उत्पादकता वाढवण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम केलं जाईल. घरी परतणाऱ्या मजुरांबरोबरच मान्सूनच्या काळातही रोजगार निर्माण केला जाईल,” असं सीतारामन म्हणाल्या.