केरळमध्ये गोमांस सेवनावर बंदी नाही, केरळमधील नागरिक गोमांस सेवन करु शकतील असे महत्त्वपूर्ण विधान नवनियुक्त केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी केले आहे. गोमांस सेवनावर बंदी आहे असे भाजपने कधी म्हटलेच नव्हते असा दावाही त्यांनी केला आहे.

बुलडोझर मॅन अशी ओळख असलेल्या के. जे. अल्फोन्स कन्नानथनम यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. अल्फोन्स यांच्याकडे पर्यटन खाते (स्वतंत्र कार्यभार) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती- तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सोमवारी अल्फोन्स कन्नानथनम यांनी पर्यटन मंत्रालयात पदभार स्वीकारला. कन्नानथनम हे केरळचे असून पदभार स्वीकारल्यावर त्यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. केरळमध्ये गोमांस सेवनावर बंदी असेल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, गोव्यात गोमांसावर बंदी नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले होते. त्याच प्रमाणे केरळमध्येही गोमांस सेवनावर बंदी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने गोमांस सेवनाला विरोध दर्शवला नाही. आम्ही सर्वसामान्यांच्या खाण्याच्या सवयीवर निर्बंध आणू शकत नाही. जनतेलाच हे ठरवू द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि ख्रिश्चन समाजात एक पूल म्हणून मी काम करणार असेही त्यांनी सांगितले. भाजप हा ख्रिश्चनविरोधी पक्ष असल्याची भीती निर्माण केली जाते असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.

केंद्र सरकारने जूनमध्ये आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घातले होते. या अध्यादेशाच्या विरोधात केरळ विधानसभेत ठराव मंजूर झाला होता. भारतात बहुसंख्य नागरिक हे मांसाहार करतात आणि नवीन नियम हे अन्यायकारक असल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले होते.