ग्राहकाने पिशवीसाठी पैसे मागितल्याबद्दल एप्रिल महिन्यात प्रसिद्ध फूटवेअर कंपनी बाटा इंडिया लिमिटेडला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. आता याच कारणासाठी देशातील सर्वात मोठी रिटेलर चेन असणाऱ्या बिग बाजारला दंड ठोठावण्यात आला आहे. चंदीगडमधील ‘राज्य ग्राहक विवाद निवारण मंचा’ने ग्राहकांकडे पिशवीसाठी पैसे मागणाऱ्या बिग बाजारला सेवेत त्रुटी आढल्याबद्दल दोषी ठरवले आहे. याप्रकरणी बिग बाजारला ११ हजार ५१८ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चंदीगडमधील पंचकुला येथे राहणाऱ्या सौरव कुमार यांनी बिग बाजारमध्ये घरगुती सामानाची बरीच खरेदी केली. त्यानंतर बील बनवताना सौरव कुमार यांच्याकडून पिशवीसाठी १८ रुपये जादा आकारण्यात आले. यासंदर्भात कुमार यांनी चौकशी केली असता पिशवीसाठी तुम्हाला पैसे द्यावेच लागतील असं सांगण्यात आले. कुमार यांनी घडलेल्या घटनेसंदर्भात ‘राज्य ग्राहक विवाद निवारण मंचा’कडे तक्रार दाखल केली.

‘२१ फेबुवारी २०१९ रोजी मी पंचकुला येथील बीग बाजारमधून खरेदी केली. त्यानंतर बील भरताना माझ्याकडून पिशवीसाठी अतिरिक्त १८ रुपये आकारण्यात आले. मी हे पैसे भरणार नाही असं कॅशिअरला सांगितले. मात्र मला ते भरावेच लागतील असं सांगत माझ्याकडून त्या एका पिशवीसाठी १८ आकारण्यात आले,’ असं कुमार यांनी मंचाकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याचप्रकरणी कुमार यांनी मंचाच्या मार्फत बिग बाजारला नोटीस पाठवली. बिग बाजारने कुमार यांनी केलेला दावा फेटाळून लावत तो फेटाळून लावला. मात्र मंचाने कुमार यांची बाजू घेतली. बिग बजारने ग्राहकाला दिलेला वागणूक निष्काळजीपणा दाखवणारी असल्याचे सांगत मंचाने बिग बजार प्रशासनाची कानउघाडणी केली.

‘देशभरामध्ये बिग बाजारची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये मोठा संख्येने ग्राहक येतात. मोठ्या प्रमाणात सामानाची विक्री करुन नफा कमवल्यानंतरही बिग बाजार सर्वसामान्य ग्राहकांकडून पिशवीसाठीही पैसे घेते. हा निष्काळजीपणा असून याला ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेतील त्रूटी म्हणता येईल,’ असं ‘राज्य ग्राहक विवाद निवारण मंचा’ने आपल्या निकालात म्हटले आहे.

या प्रकरणी बिग बाजारला ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेमध्ये पिशवीची किंमत ५०० रुपये, ग्राहकाला झालेला त्रासासाठी ५०० रुपये, कायदेशीर खर्च ५०० रुपये आणि कायदेशीर मदत निधी म्हणून १० हजार रुपयांचा समावेश आहे. हे सर्व पैसे बिग बाजारने लवकरात लवकर कुमार यांना द्यावेत असंही मंचाने सांगितले आहे.

याआधी अशाचप्रकारे ग्राहक सेवेमध्ये त्रुटी आढल्याबद्दल डॉमीनोजला १० हजार ५०० रुपये, लाइफस्टाइलला १३ हजार रुपये, वेस्टसाईड १३ हजार रुपये आणि बाटाला नऊ हजार रुपयांचा दंड ग्राहक मंचाने केल्याची उदाहरणे आहे.