बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील एका १५ वर्षीय मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळून १५ वर्षीय कृष कुमार मित्राने राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाला तपासाचे आदेश दिले आहेत.

१५ वर्षीय कृषने दोन महिन्यापूर्वी कौटुंबिक वादाला कंटाळून थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवून इच्छा मरणाची परवाणगी मागितली होती. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राची प्रत कृषने पंतप्रधान कार्यालय, बिहारचे मुख्यमंत्री आणि इतर सरकारी आधिकाऱ्यांनाही पाठवली आहे.

कृषने पत्रात असे म्हटलेय की, सार्वजनिक ठिकाणी आईचा सतत होणारा अपमान आणि सतत मिळणाऱ्या धमक्यामुळे मला त्रास होत होत आहे. मला जगायची इच्छा राहिली नाही. मला इच्छा मरणाची परवाणगी द्यावी.

कायदा काय सांगतो? –
इच्छा मरणाला भारतात कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. मिळेल अशी चिन्हही दिसत नाहीत. स्वित्झर्लंड, जपान, जर्मनी, अमेरिका या देशांमध्ये युथनेशियाला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. भारतामध्ये इच्छामरणाचा प्रश्न २०११मध्ये प्रथम चर्चेला आला. केईएम रुग्णालयात लैंगिक छळाची बळी ठरलेली नर्स अरुणा शानभाग कित्येक वर्षे अंथरुणाला खिळलेली होती. त्यामुळे तिच्या निमित्ताने हा प्रश्न ऐरणीवर येऊन देशभर चर्चेत आला होता.