पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची कसोटी पाहणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू आहे. रविवारी दुपापर्यंत देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निवडणुकीचे निकाल घोषित होतील. पाच टप्प्यांमध्ये २४३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. मुस्लीम, यादव व महादलितांच्या मतांच्या आधारावर महाआघाडीलाच विजय मिळेल असा विश्वास त्यांना आहे. भाजपमध्ये दोन मतप्रवाह असले तरी थोडय़ाफार फरकाने सरकार स्थापन होईल, असा विश्वास भाजप नेते व्यक्त करीत आहेत.

जनतेने कुणाचे ऐकले?
बिहारमध्ये पाच टप्प्यांत झालेल्या मतदानात आता जनतेने कौल कुणाला दिला आहे त्याचा निर्णय रविवारी होणार आहे. संयुक्त जनता दलप्रणीत महाआघाडी व भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात जोरदार चुरस होती. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. वादग्रस्त वक्तव्यांबद्दल राज्य निवडणूक आयोगाने १३ ‘एफआयआर’ नोंदवले. प्रचारातील काही वादग्रस्त वक्तव्ये.

नितीशकुमार यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या ‘डीएनए’मध्ये दोष आहे.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे
मुजफ्फरपूर सभेतील वक्तव्य

गोमांसावरून लालूप्रसादांनी यदुवंशीयांचा अपमान केला आहे. सैतानाला जगात केवळ लालूप्रसादांचा पत्ता कसा मिळाला.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेत टीकास्त्र
बाहरीपेक्षा बिहारीला साथ द्या.
– नितीशकुमारांची
प्रचारातील घोषणा

मला सैतान म्हणणारेच महासैतान आहेत.
– लालूप्रसादांचे मोदींना प्रत्युत्तर

डास घालवण्यासाठी कचऱ्याला आग लावतात, तसा मतांच्या आगीतून बिहारचा कचरा जाळा.
– केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती