लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तिकीट वाटपावरुन भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे. यामुळे भाजपाला आगामी काळात मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. नुकतंच पाटणा विमानतळाबाहेर असंच एक चित्र पहायला मिळालं जेव्हा केंद्रीय मंत्री आणि पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले रवीशंकर प्रसाद यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. रवीशंकर प्रसाद मंगळवारी बिहारमध्ये पोहोचले होते. पण जेव्हा पाटणा विमानतळाबाहेर ते आले तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘रवीशंकर प्रसाद गो बॅक’ अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर पक्षाचे राज्यसभा खासदार आर के सिंह यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी कऱण्यात आली.

प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना कार्यकर्त्यांनी सांगितलं की, रवीशंकर प्रसाद हवा-हवाई नेते आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्ताच नाही आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेसाठी खूप कामं केली आहेत. पण चुकीच्या व्यक्तीला तिकीट देण्यात आलं आहे, ज्याने कधीच जनतेमध्ये आला नाही. दुसरीकडे कार्यकर्त्यांनी आर के सिंह यांना पाठिंबा देत, लोकांशी जोडले गेलेले असल्याचं म्हटलं.

दुसरीकडे रवीशंकर प्रसाद यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी घोषणाबामुळे भाजपा कार्यकर्ते आपापसात भिडले. अखेर विमानतळावर उपस्थित जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपाने यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट नाकारलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पक्षविरोधी वक्तव्यांमुळे आधीपासूनच ही शक्यता व्यक्त केली जात होती. यामुळे या जागेसाठी अनेकांची नावे चर्चेत होती. यामधील एक नाव भाजपाचे राज्यसभा खासदार आर के सिंह यांचं होतं. मात्र रवीशंकर प्रसाद यांनी उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत.