बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे संधिसाधू असून त्यांची धर्मनिरपेक्षता बेगडी असल्याची टीका भाजपने शनिवारी केली. त्यामुळे एनडीएमधील मतभेदांची दरी अधिकाधिक रुंदावत चालली असल्याचे हे द्योतक मानले जात आहे.
नितीशकुमार आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांशी इतके ठाम आहेत तर गुजरातमधील दंगलींनंतर २००२मध्ये रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून ते का बाहेर पडले नाहीत, असा सवाल बिहारमधील भाजपचे मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे.
बिहारमधील जनतेने २०१०मध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीएला मतदान केले आहे, जद(यू) किंवा नितीशकुमार यांना मतदान केलेले नाही, याचे स्मरण या वेळी गिरिराज सिंग यांनी करून दिले. त्यामुळे नितीशकुमार यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी नव्याने निवडणुकांना सामोरे जावे, असेही सिंग म्हणाले.
नितीशकुमार यांनी भाजपचा उपकरण म्हणून वापर केला आणि मुख्यमंत्रीपद उपभोगले, अशी टीका पशुसंवर्धनमंत्र्यांनी केली. गुजरातमधील घटना आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत नितीशकुमार यांची संवेदनक्षमता गेल्या १० वर्षांत जागृत झाली नाही आणि आता अचानक त्यांना आपल्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांची जाणीव कशी झाली, असेही सिंग म्हणाले. बिहारमधील जवळपास ११ कोटी जनतेने निवडून दिलेल्या राज्य सरकारचा कारभार उत्तम चाललेला असताना अचानक राजकीय घडामोडी निर्माण होण्याची गरजच नव्हती, असेही ते म्हणाले.

राजनाथ सिंग यांच्या कार्यक्रमासाठी निवडली पर्यायी जागा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांचा कार्यक्रम येथील एका शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यास बिहार सरकारने अनुमती नाकारल्याने आता हा कार्यक्रम २३ जून रोजी येथील संजय गांधी स्टेडियमवर आयोजित करण्याचे भाजपने ठरविले आहे. राजनाथ सिंग यांचा कार्यक्रम २३ जून रोजी गरदानीबाग येथील संजय गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्याचे आम्ही ठरविले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले. मिलर शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यास शिक्षण विभागाने अनुमती नाकारली. मिलर शाळेच्या मैदानावर सभा घेण्यास मनाई करणाऱ्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारवर मंगल पांडे यांनी तीव्र टीका केली आहे. जद(यू)ने गेल्या नोव्हेंबर महिन्यात पक्षाच्या अधिकार मेळाव्यासाठी याच मैदानाचा वापर केला होता, असेही पांडे म्हणाले. बिहार सरकारची ही कृती आघाडीच्या धर्माविरोधातील असून हे वातावरण लोकशाहीसाठी पोषक नाही. मिलर शाळेचे मैदान हे जद(यू)च्या येथे असलेल्या मुख्यालयाच्या जवळच आहे.