भारत-म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराने कारवाई करून नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) NSCN (K) या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजप सरकार करत आहे. पण अशा प्रकारच्या अनेक कारवाया यापूर्वीही झाल्या आहेत, असे सांगून काँग्रेसनेच सरकारवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. ‘बुरे दिन’ आल्यानंतर हे सरकार सर्जिकल स्ट्राईक करते, असा हल्ला काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी चढवला.

सीमेवर नेहमीच लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी होत असतात. यापूर्वीही अशाच घटना घडलेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री होतो त्यावेळीही लष्कराने अशा अनेक कारवाया केल्या आहेत. त्याआधीही लष्कराने कारवाया केल्या आहेत, असे चिदंबरम यांनी सांगितले. माजी गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना विचारले तर तेही हेच सांगतील. सुशीलकुमार शिंदेंना विचारले तर तेही अशा कारवाया याआधीही झाल्या आहेत, असेच सांगतील. पण हे भाजप सरकार त्यांचे वाईट दिवस आले की, कुठेतरी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करते, अशी तोफ त्यांनी डागली. या देशात प्रत्येक गोष्ट सर्जिकल स्ट्राईकच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी दिले होते. पण हा सर्जिकल स्ट्राईक नाही, असे लष्कराने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कारवाई केली नाही, असे लष्कराच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले होते.