कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (एस) यांचे सरकार पाडण्याचे भाजपचे ऑपरेशन लोटस तूर्त फसल्याची चिन्हे असून भाजपने गेले काही दिवस गुरगाव येथील रिसॉर्टवर नेऊन ठेवलेले आमदार राज्यात परतले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस येडीयुरप्पा यांनी सांगितले,की सर्व १०४ आमदारांना परत बोलावण्यात आले असून ते शनिवारी रात्री परत आले आहेत. त्यांच्यापैकी काही जण थेट विमानाने मतदारसंघात गेले असून माजी उपमुख्यमंत्री आर.अशोक व के.एस. ईश्वरप्पा हे बेंगळुरूत परतले आहेत. काँग्रेसला भाजपने सरकार पाडण्याचे प्रयत्न करताना अस्वस्थ केले होते. भाजपने आमदार फोडू नयेत म्हणून काँग्रेसनेही त्यांचे आमदार बेंगळुरू नजीकच्या एका रिसॉर्टवर नेले होते.  भाजपचे नेते येडीयुरप्पा यांनी मात्र कर्नाटकातील सरकार पाडण्याचा इरादा नसल्याचे म्हटले होते. भाजपचा सरकार पाडण्याचा इरादा नाही, उलट काँग्रेसचेच चार आमदार बंडखोर आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने शुक्रवारी त्यांच्या आमदारांना रिसॉर्टवर नेले होते. किमान आठ आमदारांनी भाजपशी एकनिष्ठता दाखवली असल्याची कबुली काँग्रेस सूत्रांनीच दिली होती. भाजपने म्हटले आहे, की येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यांचे पथक सोमवारपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी भाजप आमदारांना दिल्लीहून माघारी बोलावण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भाजप आमदारांवर दोन कोटी खर्च

भाजप आमदारांना गुरगाव येथील आयटीसी ग्रँज भारत या हॉटेलवर ठेवण्यात आले होते. रोजचा खर्च प्रतिखोली २५ हजार, जेवणाचा खर्च रोज ५००० या प्रमाणे सहा दिवसात २ कोटी रूपये खर्च करण्यात आले. एकूण ६० खोल्या घेण्यात आल्या होत्या.