भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकातील विद्यमान आमदार बी.एन.विजयकुमार यांचे शुक्रवारी सकाळी बंगळुरुतील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विजयकुमार यांच्या निधनाने भाजपाला झटका बसला आहे. ते जयानगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार होते.

सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून गुरुवारी रात्री जयानगर विधानसभा मतदारसंघात प्रचारात व्यस्त असताना विजयकुमार अचानक खाली कोसळले. त्यांना लगेच जयादेवा या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आपल्या बाजूने विजयकुमार यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही असे भाजपा प्रवक्ते एस. प्रकाश यांनी सांगितले.

त्यांचा विनम्र स्वभाव, पक्ष आणि जनतेप्रती असलेली त्यांची निष्ठा कायम लक्षात राहिल. आमचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असे कर्नाटक भाजपाने टि्वट करुन सांगितले आहे. ५९ वर्षीय विजयकुमार बंगळुरुच्या जयानगर विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा आमदार म्हणून निवडून विधानसभेवर गेले. कर्नाटकमध्ये येत्या १२ मे रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून लगेचच तीन दिवसांनी १५ मे ला निकाल जाहीर होणार आहे.