देशहितासाठी भाजपा तडजोड करायला तयार आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखववा. शिवसेनेनं काँग्रेसच्या भितीमुळे आपली भूमिका बदलू नये. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे देशाचं हित आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारावं. सरकार वाचवण्यासाठी भाजपा शिवसेनेसोबत राजकीय तडजोडीसाठी तयार असल्याचं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाला समर्थन दिलं. परंतु राज्यसभेतून काढता पाय घेतला. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक देशहितासाठी आवश्यक आहे. सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला सारू नका. शिवसेनेनं महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेलं सरकार वाचवण्यासाठी तडजोड करू नये. आम्ही शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करण्यासाठी तयार आहोत. घुसखोरांना घालवलंच पाहिजे, असंही शेलार यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भारत बचाव आंदोलनावरही टीका केली. भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा हीच काँग्रेसची भूमिका आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपाचा हेतू नाही, असंही शेलार यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्यातील सरकार हे तीन चाकांवर चालणारं ऑटो रिक्षा सरकार असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेनं साद दिल्यास आमची दारं आजही उघडी आहेत. आम्ही कधीही त्यांना हाक द्यायला तयार आहोत. परंतु समोरून प्रतिसाद यायला हवा, असंही ते म्हणाले होते.