राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष समारोप वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या भाषणाने देशात सहिष्णुतेचे वातावरण वाढीला लागण्यास मदत होईल असे वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे. प्रणव मुखर्जी यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी निमंत्रित केले आणि हे निमंत्रण प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारले या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आहेत. मोहन भागवत यांनी वेगळ्या विचारांच्या ज्ञानी माणसाला संघाच्या मंचावर आणले. या दोघांनी संघाच्या मंचावर केलेली भाषणे देशाला दिशा देणारी ठरली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रणव मुखर्जी यांच्या भाषणामुळे विचारांचे आदानप्रदान होऊ शकले. त्यांनी मांडलेली भूमिका देशाला सहिष्णू वातावरणाकडे नेणारी आहे असेही लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केले.

प्रणव मुखर्जी आणि आणि मोहन भागवत या दोघांनी मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. आपल्या देशात विविधेतून कशी एकता आहे आणि त्यातूनच राष्ट्रवाद कसा वाढवला पाहिजे हे सांगणारी दोघांचीही भाषणे होती. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार आणि विचार देशापर्यंत पोहचवला. प्रणव मुखर्जी हे अनेक दशकांपासून काँग्रेसच्या विचारधारेसोबत आहेत. मात्र संघाच्या मंचावर अत्यंत खुलेपणाने त्यांनी आपली भूमिका मांडली. भारतीय राजकारणातले हे चांगले उदाहरण आहे असेही लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.

प्रणव मुखर्जी यांनी देशाची संस्कृती, इतिहास, स्वातंत्र्यलढा यांचा उल्लेख आपल्या भाषणात करत देशात सहिष्णुता कशी टिकली पाहिजे याचे उदाहरण देशासमोर ठेवले. संघाच्या मंचावर प्रणव मुखर्जी यांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीतून देशापुढे आदर्श विचार ठेवले असेही अडवाणी यांनी म्हटले आहे. प्रणव मुखर्जी यांना जेव्हा संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले तेव्हा बराचसा वाद निर्माण झाला. मात्र मोहन भागवत आणि प्रणव मुखर्जी यांनी मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संस्कृतीबाबत भूमिका मांडली. ही बाब अत्यंत स्तुत्य आहे अशीही भूमिका लालकृष्ण अडवाणी यांनी मांडली.