फेसबुककडून भाजपाला पोषक वातावरण तयार केल्याचे आरोप एकीकडे काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून मोठे आरोप केले आहे. या सर्व आरोपांमध्ये त्यांचं पत्र महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, भारतातील फेसबुकची टीम राजकीय विचारांवर भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे.

“फेसबुकची भारतातील टीम राजकीय विचारांच्या आधारे भेदभाव करत आहे. फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ केंद्रीय नेत्यांप्रती अपशब्दांचा वापर करतात. तसंच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार फेसबुकचे भारतील कर्मचारी एका विशिष्ठ राजकीय विचारांचे आहेत,” असं रविशंकर प्रसाद यांनी पत्रात नमूद केलं आहे.

२०१९ च्या निवडणुकीपूर्वी फेसबुक इंडिया व्यवस्थापनाने उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचे फेसबुक पेज हटवले किंवा त्यांची पोहोच कमी केली, असंही प्रसाद यांनी पत्रात नमूद केलं आहे. “फेसबुकनं निष्पक्ष असायला हवं. कोणत्याही संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींना काही आवडत असेल किंवा नसेल. परंतु संस्थेच्या पॉलिसीवर त्याचा कोणताही परिणाम होऊ नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यापूर्वी प्रतिसाद नाही

“या प्रकरणी यापूर्वीही फेसबुकच्या व्यवस्थापनाला मेल केला होता. परंतु त्याचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कोट्यवधी लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर विशिष्ट राजकीय विचारसरणी थोपवण्याचा प्रयत्न झाला तर ते स्वीकारलं जाणार नाही,” असंही प्रसाद यांनी स्पष्ट केलं.