राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट असले तरी लालकृष्ण अडवाणींसाठी भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर जोरदार बॅटींग केली आहे. अडवाणीच या पदासाठी योग्य आणि अनुभवी उमेदवार असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.

देशभराचे लक्ष लागलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आवश्यकता भासल्यास १७ जुलैरोजी मतदान होणार आहे. या पदासाठी भाजपकडून अडवाणींना उमेदवारी मिळावी यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरुन त्यांचे समर्थन केले आहे. काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांची अडवाणींशी केरळमध्ये भेट झाली होती. या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला होता. याच फोटोचा दाखला देत शत्रुघ्न सिन्हांनी मंगळवारी अडवाणींसाठी बॅटींग केली. देशासाठी केलेल्या कार्यासाठी मी अडवाणींना वंदन करतो. त्यांनी संपूर्ण जीवन देश आणि पक्षासाठी दिले असून माझ्यासारखे असंख्य लोक त्यांचे चाहते आहेत असे सिन्हा यांनी म्हटले आहे.

अडवाणींनी देशाचे नेतृत्व करावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. पंतप्रधानपदासाठी योग्य असलेल्या व्यक्तीला बाजूला कसे केले जाते हा प्रश्न पडतो असे सांगत त्यांनी नरेंद्र मोदींनाही चिमटा काढला. ते देशासाठी काय करु शकतात हे दाखवण्याची संधीच त्यांना कधी मिळाली नाही. त्यांच्या अनुभवावर भाजप आणि भाजपबाहेरील मंडळीही आक्षेप घेऊ शकत नाही असे सिन्हांनी नमूद केले.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येताच त्यांचे समर्थक आणि हितचिंतकांना ते या पदावर विराजमान व्हावे असे वाटत आहे. देशातील सर्वोच्च पदासाठी तेच योग्य आहेत असे सिन्हांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपकडून निवडणुकीसाठी संभाव्य दावेदारांमध्ये मोदी सरकारमधील थावरचंद गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. गेहलोत यांच्या नावाला संघानेही पाठिंबा दर्शवला आहे. संघाचे प्रचारक राहिलेले थावरचंद गेहलोत हे भाजपचे राष्ट्रीय सचिव, महासचिव आणि उपाध्यक्ष पदावर होते. याशिवाय लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू चर्चेत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांचे नाव चर्चेत असले तरी बाबरीप्रकरणामुळे त्यांचे नाव या स्पर्धेत काहीसे मागे पडल्याचे दिसते.