पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे ताबडतोब जाहीर करावे, अशी मागणी भाजपने रविवारी केली. आगामी संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेते भेटणार आहेत. भाजपने या भेटीला कडाडून विरोध केला असून पंतप्रधानांनी पाकिस्तानी सैन्याची सीमेवरील घुसखोरी तसेच शस्त्रसंधीचे वारंवार होणारे उल्लंघन याबाबत ठोस निर्णय घ्यावेत आणि सर्व पक्षांना विश्वासात घेऊन पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली आहे.
भारताचा विश्वासघात
दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित सभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध ठेवण्यास आपण सदैव प्रयत्न केले. मात्र त्यांनी नेहमीच भारताचा विश्वासघात केला. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आता कठोर भूमिका घेऊन यापुढे पाकिस्तानशी कोणतीही चर्चा न करण्याची तातडीने घोषणा करावी, अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली.