गुजरातेतील फक्त दोन आमदारांच्या उमेदवारीला कात्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या गुजरात निवडणुकीची सत्तर उमेदवारांची पहिली यादी भाजपने शुक्रवारी दुपारी जाहीर केली. सर्व मंत्र्यांच्या आणि बहुतेक आमदारांच्या तिकिटांना कात्री लावण्याचे टाळताना पक्षाने सावध पवित्रा घेतल्याचे दिसते आहे. त्याचबरोबर पटेल आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) निम्म्याहून अधिक प्रतिनिधित्व दिले आहे.

बुधवारी सायंकाळीच पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. मात्र, यादी जाहीर करण्यासाठी शुक्रवार उजाडला. या पहिल्या यादीत मुख्यमंत्री विजय रूपानी (राजकोट पश्चिम), उपमुख्यमंत्री नितीन पटेल (मेहसाणा), प्रदेशाध्यक्ष जीतूभाई वाघाणी (भावनगर पश्चिम) यांच्यासह पंधरा मंत्र्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या पाच बंडखोर आमदारांनाही तिकिटे देण्यात आली आहेत. त्यामध्ये अमूल डेअरीचे अध्यक्ष असलेल्या रामसिंह परमार यांना थसरा, तर ज्येष्ठ नेते राघवजी पटेल यांना जामनगर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे.

बडोद्यातील अपक्ष आमदार केतन इनामदार हे या वेळी भाजपकडून उभे आहेत. सौराष्ट्रमध्ये लक्षणीय संख्या असलेल्या कोळी समाजाला सहा तिकिटे दिली आहेत. त्यामध्ये पुरुषोत्तम सोलंकी (भावनगर ग्रामीण) आणि त्यांचे बंधू हिरा सोलंकी (राजुला) या दोघांचा अपेक्षेप्रमाणे समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ व दक्षिण गुजरातचा समावेश आहे. सौराष्ट्र व दक्षिण गुजरात पटेलबहुल असल्यामुळे पटेलांना उत्तम प्रतिनिधित्व दिले गेले आहे.

  • सत्तर उमेदवारांमध्ये १५ पटेल, १८ इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि सहाजण कोळी समूहाचे आहेत.
  • पंधरा मंत्र्यांची तिकिटेही सुरक्षित. काँग्रेसच्या पाच बंडखोरांनाही तिकिटे. पहिल्या यादीत १६ चेहरे नवे आहेत.
  • फक्त दोन आमदारांचीच तिकिटे नाकारली. वर्षां दोशी (वढवण) आणि भावना मकवाना (महुआ) अशी त्यांची नावे आहेत.
  • सत्तरपैकी ४२ उमेदवारांची निवडणूक पहिल्या टप्प्यात आहे, तर २८ जण दुसऱ्या टप्प्यातील आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ व दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान आहे.