लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष सज्ज असून, उत्तम शासन आणि विकास या दोन मुद्द्यांवरच पक्ष निवडणूक लढवेल, असे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक सोमवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये झाली. बैठकीला पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासह लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज आदी नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पक्षाचे सरचिटणीस अनंतकुमार म्हणाले, कोणत्याही क्षणी निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्ष त्यासाठी सज्ज आहे. संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये देशातील सध्याची राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती काय असावी, यावर यावेळी चर्चा झाली.
केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून दाखविण्यासाठी येत्या काही दिवसांत विविध समित्या स्थापन केल्या जातील. केंद्र सरकारचा भ्रष्टाचार, महागाई आणि आर्थिक आघाडीवरील अपयश उजेडात आणण्यासाठी या समित्या काम करतील, असेही त्यांनी सांगितले.