दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला त्यापेक्षाही भाजपचा जास्त दारुण पराभव बिहार विधानसभा निवडणुकीत होईल, असे भाकीत काँग्रेसने वर्तविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीपेक्षाही बिहारमध्ये अधिक दारुण पराभव पत्करावा लागणार आहे. बिहारमध्ये त्यांना कधीही विजय मिळणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते मीम अफझल यांनी म्हटले आहे.
बिहारमधील तिसऱ्या आघाडीकडून भाजपला पराभव पत्करावा लागण्याची चिन्हे आहेत. जेव्हा तिसरी आघाडी एकत्र आली तेव्हा केंद्रातील सत्तारूढ पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे, काँग्रेसलाही त्याचा फटका बसला आहे, असेही अफझल म्हणाले.
काँग्रेसने बिहारमध्ये निवडणूकपूर्व आघाडी केलेली नाही, मात्र काँग्रेस तिसऱ्या आघाडीचाच एक भाग आहे, असेही ते म्हणाले.
‘सर्वात अकार्यक्षम सरकार’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशातील आतापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम सरकार असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी भोपाळ येथे केली आहे.
मोदी सरकार सर्व आघाडय़ांवर विशेषत: सीमेवर अपयशी ठरले आहे, देशाची सुरक्षा धोक्यात आहे, गेल्या वर्षभरात शस्त्रसंधी उल्लंघनाचे ७४६ प्रकार घडले, यूपीएच्या राजवटीत केवळ ९६ वेळाच उल्लंघन झाले होते, असेही शकील अहमद म्हणाले.
परदेशात जाताना पंतप्रधानांसमवेत परराष्ट्र व्यवहारमंत्री असतात असे संकेत आहेत, असे असतानाही सुषमा स्वराज यांच्याऐवजी गौतम अदानी मोदी यांच्यासमवेत परदेश दौऱ्यावर गेले, असेही अहमद म्हणाले.