गुजरातमधील राज्यसभेच्या दोन्ही जागांवर भाजपाने बिनविरोध जिंकल्या आहेत. तर, काँग्रेसने अहमद पटेल यांची जागा देखील गमावली आहे. भाजपाचे दिनेशचंद्र जमलभाई अनावाडिया आणि रामभाई हरजीभाई मोकारिया यांनी विजय मिळवला आहे. निवडणूक अधिकारी सी बी पांड्या यांनी काल (सोमवार) अनावाडिया व मोकारिया यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. उमेदवारी परत घेण्यासाठी कालचा शेवटचा दिवस होता.

गुजरातमधील या दोन्ही जागा काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि भाजपाचे अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या होत्या. अहमद पटेल यांचा करोनाशी निगडीत समस्यांमुळे मागील वर्षी २५ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला आहे. १९९३ पासून ते त्या जागेवरून खासदार होते. तर दुसरी जागा भाजपा सदस्य अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. ते पहिल्यांदा २०१९ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांचे १ डिसेंबर रोजी करोनामुळे निधन झाले आहे.

भाजपाचे दोन डमी उमेदवार रजनीकांत पटेल आणि किरीट सोलंकी यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला होता. राज्यसभेच्या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक स्वतंत्र होणार होती. १८२ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसकडे ६५ आमदार व तर भाजपाचे १११ आमदार आहेत. असल्याने काँग्रेसच्या विजयाची शक्यता फारच धुसर होती. त्यामुळे काँग्रेसकडून एकाही उमेदवारास मैदानात उतरवण्यात आले नव्हते.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला झटका बसला आहे. काँग्रेसच्या वाट्याची एक जागा देखील भाजपाकडे गेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे खास अहमद पटेल यांची ती जागा होती.