‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने गेल्या वर्षांपासून दोन हजार महिला व मुलींचे अपहरण केले आहे, अशी माहिती अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आज दिली. बोको हरामने २१९ नायजेरियन शाळकरी मुलींचे अपहरण केले त्याला आज वर्ष पूर्ण झाले.
बोर्नो या ईशान्येकडील राज्यात चिबोक येथून या किशोरवयीन मुलींचे गेल्या वर्षी १४ एप्रिलला अपहरण करण्यात आले होते, त्यामुळे जगाचे लक्ष बोको हरामच्या क्रूरतेकडे वेधले गेले होते. ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या मानवी हक्क गटाने इस्लामी दहशतवाद्यांनी महिला व मुलींचे अपहरण केल्याची ३८ प्रकरणे घडली असून त्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिल्याचे म्हटले आहे. त्यातील काही महिला व मुली बोको हरामच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाल्या आहेत.
‘अवर जॉब इज टू शूट, स्लॉटर अँम्ड किल- बोको हराम रेन ऑफ टेरर’ या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. एकूण २००० पेक्षा अधिक महिला व मुलींचे अपहरण त्यांनी केले आहे. चिबोक येथून अपहरण केलेल्या मुलींचे बोको हरामने चार गट करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहे. त्यातील काही बोर्नोतील सामबिसा जंगलात आहेत, काही गोर्सी पर्वताजवळ चॅड सरोवराजवळ आहेत तर ७० मुली चॅड देशात आहेत. नायजेरियाच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार त्या मुली कुठे आहेत हे त्यांना माहिती आहे पण त्यांना सोडवण्याची मोहीम जोखमीची असल्याचीही कबुली दिली आहे. मे महिन्यात बोको हरामने एक दृश्यचित्रफीत जारी केली होती. त्यानंतर या मुली दिसलेल्या नाहीत. त्या दृश्यफितीत १०० मुली मुस्लीम वेशात कुराण पठण करताना दिसत आहेत. बोको हरामचा नेता अबू बकर शेकाऊ याने सांगितले की, आम्ही त्यांचे इस्लाममध्ये धर्मातर केले आहे व त्यांची लग्ने लावून दिली जातील. मानवी हक्क कार्यकर्त्यांने दिलेल्या माहितीनुसार अपहरण करण्यात आलेल्या ८० महिला व मुलींच्या मुलाखती घेतल्या असता त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला किंवा शिबिरात आणण्याआधीच त्यांच्यावर विवाह लादण्यात आला. १९वर्षांच्या एका मुलीने सांगितले की, पाच जणांनी आपल्यावर अनेकदा बलात्कार केला; काही वेळा तीन, काही वेळा सहा जणांनीही बलात्कार केला. ज्यांनी बलात्कार केला ते आमच्या खेडयातील शाळकरी सहाध्यायी होते व त्यांनी हे क्रूर प्रकार केले.