सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाची व्यथा मांडणाऱ्या बीएसएफच्या जवानावर दबाव टाकला जात असून, बीएसएफच्या मुख्यालयात बदली केली आहे. तसेच तिथे प्लंबरचे काम देण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच वरिष्ठांनी व्हायरल केलेला व्हिडीओ मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचेही त्याने सांगितले.

सीमारेषेवर तैनात जवानांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची व्यथा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) तेज बहादूर यादव याने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून मांडली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले असतानाच तेज बहादूर यादव याने आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. फेसबुकवर पोस्ट केलेला व्हिडीओ मागे घेण्यासाठी आपल्यावर वरिष्ठांकडून दबाव आणला जात आहे, असे त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आपली बदली बीएसएफच्या मुख्यालयात केली असून प्लंबरचे काम देण्यात आले आहे. तसेच वरिष्ठांनी ‘तो’ व्हिडीओ मागे घ्यावा, यासाठी दबाव आणला आहे, असे त्याने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

नोकरी जाईल, याची मला भीती नाही. सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांना दिले जाणारे जेवण निकृष्ट असल्याची व्यथा मांडणारा व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई होईल, याचीही तमा नसल्याचे बीएसएफ जवान तेज बहादूर यादव याने म्हटले आहे. मला नोकरी गमावण्याची भीती नाही. मी त्या व्हिडीओमधून सत्य परिस्थितीच समोर आणली आहे, असेही त्याने सांगितले. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या जवानाची कारकीर्द वादग्रस्त असल्याचे बीएसएफने म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले होते. यापूर्वी त्याच्यावर चार वेळा शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती, असेही त्यांनी म्हटल्याचे सांगण्यात येते. बीएसएफमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेज बहादूरची कारकीर्द वादग्रस्त आहे. त्याच्यावर चार वेळा शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. मद्यप्राशन करणे, अधिकाऱ्यांसोबत उद्धटपणे वर्तन करणे, वारंवार सुटी घेणे अशा विविध कारणांमुळे तेज बहादूर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असायचा असे बीएसएफमधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तेज बहादूरला शिस्तभंगाप्रकरणी शेवटची झालेली शिक्षा म्हणजे सात दिवसांचा तुरुंगवास होता. बीएसएफ न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली होती. तेज बहादूर यादवने काही दिवसांपूर्वी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्जही दिला आहे, असेही सांगण्यात आले होते.