Bulandshahr violence: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील हिंसाचारातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून योगेश राज हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. योगेश राज हा बजरंग दलाचा नेता असून त्यानेच जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे गोहत्येप्रकरणीही त्यानेच पोलिसांकडे तक्रार केली होती.

बुलंदशहरातील हिंसाचाराचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या प्रकरणी ८५ हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी हा योगेश राज आहे. योगेश राजने जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप असून तो बजरंग दलाचा नेता आहे.

३०० ते ५०० जणांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुमार यांनी सांगितले. योगेश राज आपल्या साथीदारांसोबत तिथे हजर होता. दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास जमाव पोलीस ठाण्यावर पोहोचताच पोलीस निरीक्षकासह अन्य कर्मचाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हातात शस्त्रास्त्र घेऊन मोर्चात सामील झालेले लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्याकडील परवाना असलेली पिस्तूल, मोबाइल फोन हिसकावला. तसेच वायरलेस सेटचीही तोडफोड करण्यात आली. योगेश राज हाच जमावाला चिथावणी देत होता, असा आरोप आहे. तर योगेश राजने प्रतिक्रिया देताना हे आरोप फेटाळले होते. ‘मी घटनास्थळी होतो, पण मी जमावाला चिथावणी दिलेली नाही,हिंसाचार घडवणे हा आमचा उद्देश नव्हता’, असे त्याने सांगितले.

योगेश राज हा बजरंग दलाचा जिल्हा अध्यक्ष असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी शिखर अग्रवाल हा भाजपाच्या युवा मोर्चाचा सदस्य आहे. तर विश्व हिंदू परिषदेचा सदस्य उपेंद्र राघव याचाही आरोपींमध्ये समावेश आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, जमावाला चिथावणी देणे, हिंसाचार अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय झाले होते बुलंदशहरात ?
बुलंदशहरामध्ये गेले तीन दिवस एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर गोहत्या झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. यानंतर परिसरात हिंसाचार सुरु झाला. महाव खेड्याच्या परिसरात हिंसक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. अनेक वाहने पेटवून दिली. एका पोलीस चौकीला आग लावली. या हिंसाचारात स्याना पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंग जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास जमावाने अडथळे आणल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर हा हिंसाचार पाहत असलेला एक तरुण गोळीबारात ठार झाला.