बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांनी पकोडे विकावेत या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या सल्ल्यावरून देशभरात सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. संसदेतही यावर मोठी चर्चा झाली. पिता होण्याचे दु:ख पंतप्रधान नरेंद्र मोदी समजू शकणार नाही. पण भाजपा अध्यक्ष अमित शहा हे नक्कीच समजू शकतील, असा टोला समाजवादी पक्षाचे खासदार नीरज शेखर यांनी लगावला. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत मोदींवर नीरज यांनी टीका केली.

ते म्हणाले, पकोडे विकणे हाही एक रोजगार आहे, या पंतप्रधानांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. काम करणारे सर्वच लोक समान असतात. त्यांचे स्वत:चे एक अस्तित्व असते. जेव्हा पकोडे विकणारा माणूस उपाशी राहून आपल्या मुलाला शिकवत असतो. तेव्हा त्याला वाटत असते की, त्याचा मुलगा डॉक्टर व्हावा, अभियंता व्हावा. आपल्या मुलाने आपल्या बाजूलाच उभा राहून पकोडे तळावे, असे त्याला कधीच वाटत नसते. पंतप्रधान पिता होण्याचे दु:ख समजू शकणार नाही, हे मी मान्य करतो. पण किमान अमित शहांनी तर हे दु:ख समजून घेतले पाहिजे.

जर देशाचा पंतप्रधान पकोडे विकण्याचा सल्ला देत असेल तर युवकांच्या आत्मसन्मानावर कसा प्रभाव पडत असेल, याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत १३ कोटी युवक मतदान करण्यासाठी पात्र होतील. ते भाजपाच्या रोजगाराच्या मुद्द्याला सडेतोड उत्तर देतील, असेही ते म्हणाले. यावेळी अमित शहा ही सदनात उपस्थित होते.