मद्यसम्राट विजय मल्या याचे भारतात प्रत्यार्पण कधी केले जाईल त्याचा कालावधी ब्रिटन सरकार निश्चित करू शकत नाही, देशाच्या सीमा ओलांडून कोणत्याही गुन्हेगाराला कारवाई टाळता येणार नाही, असा निर्धारही करण्यात आला आहे, असे ब्रिटनचे उच्चायुक्त सर फिलीप बार्टन यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

मल्या याने ब्रिटनमध्ये आश्रयाची मागणी केली आहे का, असे विचारले असता माध्यमांशी ऑनलाइन चर्चा करताना बार्टन यांनी सांगितले की, आपल्या सरकारने अशा प्रश्नांवर कधीही भाष्य केलेले नाही. मल्या याच्या प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत ब्रिटन सरकारकडे कोणतीही नवी माहिती नाही. प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे, त्यावर आपण अधिक भाष्य करू शकत नाही, असे बार्टन यांनी म्हटले.